आमची १९८८ साली दहावी उत्तीर्ण झालेली बैच. ह्या आठवणींना आमच्या सहध्यायानी २००९ च्या स्नेहसंमेलनात उजाळा दिला. त्या लिखित स्वरुपात उतरविण्याचा हा प्रयत्न!
१९७८ साली आम्ही बालवाडीत प्रवेश केला. बालवाडीचा वर्ग शाळेच्या वाचनालयात भरत असे, साधले बाई ह्या आमच्या वर्गशिक्षिका आणि ठाकूर बाई ह्या मुख्याध्यापिका होत्या. शाळा बहुदा ३-४ तासांची असे आणि त्यातील बहुतांशी वेळ आम्ही रडण्यात घालवत असू. माझ्या काकी / काकू नंदिनी पाटील आणि त्यांच्या जिवलग मैत्रीण असलेल्या मांजरेकर मॅडम मला बघून जाण्यासाठी अधून मधून त्या वर्गात फेरी मारत. एकंदरीत मजेचेच वातावरण असे.
रोहिणी चौधरी बाई ह्या आमच्या पहिलीच्या वर्गशिक्षिका होत्या. शालेय जीवनातील आमच्या त्या आवडत्या बाई होत. बालवाडीत एकत्र असलेले राकेश आणि निलेश राऊत ह्या राऊतबंधूंना पहिल्या इयत्तेत वेगळ्या तुकडीत जावे लागल्यामुळे त्यांच्या निरागस मनांवर फार मोठा आघात झाला :). पहिलीत जमिनीवरील बैठी बाके आणि सतरंजी अशी आमची बैठक व्यवस्था असे. वर्षात एकंदरीत चार परीक्षा असत, दोन घटक चाचण्या, सहामाही आणि वार्षिक परीक्षा. बाकी पहिलीचा अभ्यासक्रम वगैरे काही लक्षात नाही. पहिलीत असलेली स्मरणशक्ती स्पर्धा मात्र आठवते. एका खोलीत १० वस्तू ठेवल्या होत्या. आम्हा सर्व मुलांना तिथे नेवून २ मिनटे त्या वस्तू दाखवण्यात आल्या आणि मग परत येवून त्या वस्तूंची नावे लिहिण्यास सांगण्यात आली.
आमचे क्रिकेट वेड पहिलीपासून होते. शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शिक्षक वसाहतीतील पिंगळे सरांच्या दिवाणखान्यातील दूरदर्शन संच आम्ही बाहेरून पाहत असू. त्यावेळी आलेला इंग्लंडचा संघ अजून लक्षात आहे. त्यावेळी थम्स अपच्या बाटल्यांच्या झाकणात चित्र मिळत आणि ह्या चित्रांचा एक समूह गोळा केल्यास एक छोटी पुस्तिका मिळे. अशा एका पुस्तिकेत असणारी कपिल देवची असंख्य चित्रे भराभर चाळल्यास तयार होणारी गोलंदाजीची लयबद्ध धाव अजून लक्षात आहे. वर्गातील बहुसंख्य मुले वसई गावातीलच असल्यामुळे त्या सर्वांचे पालकही एकमेकांचे ओळखीचे असत. बालवाडीतील एक दुःखद प्रसंग म्हणजे वर्गशिक्षिका न येण्याचा दिवस. त्या दिवशी पूर्ण वर्ग फोडला जावून बाकीच्या तुकड्यांमध्ये तो विभागला जाई. मधल्या सुट्टीत हे सर्व बिछाडलेले जीव एकत्र येण्याचा क्षण फारच हृदयस्पर्शी असे! आमच्या वर्गात एक मंगेश पाटील नावाचा मुलगा होता. एका परीक्षेच्या वेळी तो अनवधानाने उत्तरपत्रिका घेवून घरच्या मार्गी लागला. काही अंतर कूच केल्यावर त्याला आपली चूक ध्यानात आली आणि तो बाईंना परत येवून आपली उत्तरपत्रिका देता झाला.
दुसऱ्या इयत्तेत बऱ्याच काळापर्यंत आम्हाला वर्गशिक्षिका नसल्याने आम्ही वर्ग फोडण्याच्या दुर्धर प्रसंगास बराच काळ सामोरे गेलो. काही काळानंतर कुंदा बाई ह्या वर्गशिक्षिका म्हणून आल्या. उंच वैद्य बाई आम्हाला विज्ञान शिकवीत. त्यांनी शिकवलेली वाऱ्याची 'हलत्या हवेला वारा म्हणतात' ही व्याख्या अजूनही माझ्या ध्यानी राहिली आहे. त्याच प्रमाणे विरारच्या चोरघे बाई आणि छबीला बाई ह्या आम्हास शिकविण्यास होत्या. त्यावेळची मुले चळवळी असत. वर्गात, पटांगणात, मैदानात नियमितपणे पडत. पडल्यावर त्यांना जखमा होत आणि अशा वेळी बेबीताई धावून येई आणि मग ते प्रसिद्ध लाल औषध जखमेवर लावले जाई. बहुतांशी जखमा ह्या औषधापुढे माघार घेत. शाळेच्या शिक्षकांसाठी एक कठीण प्रसंग म्हणजे शाळा तपासणी अर्थात इन्स्पेक्शन! मुलांच्या कामगिरीवर शिक्षकांचे भवितव्य ठरत असे. अशाच एका शाळा तपासणीच्या प्रसंगी आमच्या वर्गातील एका मुलास केवळ प्रसंगाच्या दडपणामुळे सीता कोण ह्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. पहिली दुसरीमध्ये केव्हातरी आमची सहल तुंगारेश्वर इथे बसने गेली होती. परत येताना आरक्षित केलेली बस बराच वेळ न आल्याने आम्हांला आणि त्याहून जास्त आमच्या बाईंना जास्त दडपण आले होते. शेवटी एकदाची बस आली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
तिसरी इयत्ता एका आनंददायी घटनेने सुरु झाली. साधना फडके ही शालांत परीक्षेत महाराष्ट्र बोर्डात सर्वप्रथम आली. सनईच्या मंगल स्वरांनी शाळेचा आसमंत भरून गेला. आम्हा सर्वांना पेढे देण्यात आले आणि शाळा लवकर सोडल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला. दूरध्वनीचे प्रमाण अत्यल्प असल्याच्या ह्या काळात ही गोड बातमी आम्ही मुलांनी आपापल्या घरी पोहचवली! चौधरी बाई ह्या आमच्या वर्गशिक्षिका म्हणून परत आल्यामुळे आम्ही आनंदलो! एका विशिष्ट दिवशी (बहुधा भगिनी चंद्राबाई ह्यांच्या स्मृतीदिनी) शाळेतील शिक्षिका जेवण बनवीत. आपल्या आवडत्या शिक्षिकांच्या हाताचे रुचकर भोजन घेणे हा एक आनंददायी प्रसंग असे. शाळेत संगीताचाही एक तास असे आणि त्यावेळी मुंडले बाई आम्हास शिकविण्यास येत. त्यावेळी बामचा घमघमाट वर्गात पसरे. मुंडले बाईंची 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' आणि अशी अनेक गाणी अजूनही लक्षात आहेत.
चौथीत मराठीला शेंडे बाई, गणिताला कुंदा बाई, विज्ञानाला देवयानी बाई आणि इतिहासाला राऊत बाई असा शिक्षक वर्ग होता. आमचा चौथीचा वर्ग शाळेच्या प्रवेशद्वाराशी होता. त्या वर्गातून बाहेर जाण्याचे दोन मार्ग असत, एक दारातून येण्याजाण्याचा अधिकृत मार्ग आणि दुसरा गमनाचा खिडकी मार्ग! एकदा हा गनिमी मार्ग अवलंबिल्यामुळे देवयानी बाईंनी मला ओरडले होते. राऊत बाई स्कॉलरशिपचा क्लास शनिवारी शाळा संपल्यावर आणि रविवारी घेत असत. शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या पहिल्या मजल्यावरील वर्गात बऱ्याच वेळा हा क्लास होई. तेथून वसई मैदान आरामात दिसे. आमचे आणि बाईंचेही लक्ष अधून मधून तिथे असे. आंतरशालेय स्पर्धेच्या वेळी आमच्या वर्गातील रेखा कारवाल्हो बऱ्याच वेळा धावताना दिसल्यामुळे ती जिंकत असावी असा निष्कर्ष बाईंनी काढला. असेच एकदा मला एक निरोप देण्यासाठी शिक्षकांच्या कक्षात पाठविण्यात आले. तिथे शाळेचा कर्मचारी प्रश्नपत्रिकेच्या छायाप्रती काढत होता. तिथे इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेतील शहाजीराजाविषयीचा प्रश्न माझ्या दृष्टीस पडला. शालेय जीवनातील माझे बरेच दिवस ठेवलेले गुपित होते. चौथी ड वर्गात धनाजी आणि कनोजिया ही मस्तीखोर जोडी प्रसिद्ध होती. ह्या दोघांच्या पट्टीच्या मारामार्या त्याकाळी विख्यात होत्या. शालेय क्रीडा महोत्सवाच्या वेळी लंगडी स्पर्धेवर आमचे विशेष लक्ष असे. फार प्रयत्न करून सुद्धा आमचा संघ लंगडी स्पर्धा कधी जिंकू शकला नाही. चौथीची परीक्षा जिल्हा पातळीवर घेतली जात असे. आमची परीक्षा बहुदा १९ आणि २० एप्रिल १९८२ रोजी झाली. प्रथम दिवशी मराठी, गणित आणि दुसर्या दिवशी इतिहास-भूगोल, विज्ञान असे वेळापत्रक होते. ह्या परीक्षेनंतर प्राथमिक शालेय जीवन संपले. एक विशेष नमूद करण्याची गोष्ट म्हणजे यात सर्व बाईच होत्या आणि कोणी गुरुजी नव्हते.
तत्कालीन शाळेतील मुलांचे वेळ घालविण्याचे काही समान छंद / उद्योग होते. बिदीच्या बाजूला वाहणाऱ्या ओह्ळातील मासे पकडणे हा फार वरच्या क्रमांकावरील उद्योग होता. तसेच जवळच असणाऱ्या वाडीतील केळींच्या फण्याविषयी ह्या मंडळीनी कधी दुजाभाव बाळगला नाही. ह्या वाड्या आपल्या असो की दुसर्यांच्या, त्यातील केळ्यांना / पपयांना ह्या शालेय विद्यार्थ्यांनी सारख्याच प्रेमाने वागविले. तत्कालीन वसईतील वातावरणाविषयी कविता आपण
http://nes1988.blogspot.in/2012/08/blog-post_30.html इथे वाचू शकता.
पाचवीत प्रवेश करताना आम्ही इंग्लिशच्या आगमनामुळे उत्साहित होतो. मदने मॅडम ह्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या. अत्यंत कडक शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती होती. मस्तीखोर मुलांची डोकी एकमेकांवर आपटण्याची शिक्षा त्या क्वचितच अमलात आणीत. माझ्या आईची आणि त्यांची शिक्षकांच्या आंतरशालेय व्यासपीठावर ओळख असल्यामुळे मी स्वतःला काहीसा सुरक्षित समजत असे. वर्तक बाई हिंदी शिकवीत असत आणि इंग्लिश साठी मुंडले सर होते. CLASS ह्या शब्दाचे अनेकवचन मी CLASSS असे लिहिले. तेव्हा त्यांनी भर वर्गात माझे नाव न घेता 'एका गाढवाने' CLASSS असे अनेकवचन लिहिले असल्याचा उल्लेख केला. सुहास पाटीलचे ह्या वर्षी आमच्या वर्गात आगमन झाले आणि मला शाळेत येण्याजाण्यासाठी सोबती मिळाला. १९८२ साली एशियाडच्या निमित्ताने रंगीत दूरदर्शन प्रसारणास प्रारंभ झाला. ह्या स्पर्धेतील हॉकीच्या अंतिम सामन्यातील पाकिस्तानने केलेला ७ - १ असा दारूण पराभव अजूनही लक्षात आहे. मी पाचवीत असताना गणित प्राविण्य आणि प्रज्ञा स्पर्धेत भाग घेतला. ह्या स्पर्धा अंधेरीच्या परांजपे विद्यालयात झाल्या. मजेची गोष्ट म्हणजे लोकलने जाताना दोन्ही वेळा माझ्या वडिलांचे पाकीट मारले गेले. दुसऱ्या वेळी तर वरच्या खिशात पाच रुपये शिल्लक राहण्याचा दुर्धर प्रसंग ओढविला.
सहावीत गावडे मॅडम ह्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या आणि त्या आम्हास इंग्लिश विषय शिकवीत. त्या वर्गातील तीन रांगांमध्ये स्पेलिंग स्पर्धा भरवित असत आणि आम्ही त्यात मोठ्या चढाओढीने भाग घेत असू. गानू सर हिंदी शिकवीत. त्यांची छडी फार प्रसिद्ध होती. एक धडा शिकवून झाल्यावर त्यावर ते मुलांना पंधरा गाळलेले शब्दांचे प्रश्न आणि दहा एका वाक्यातील प्रश्न बनवून आणायला सांगीत. त्यामुळे राम खेत गया हे वरवर निरुपद्रवी वाटणारे वाक्य मी रिक्त स्थानोंकी पूर्ती करो आणि एक वाक्य में जबाब दो अशा दोन्ही ठिकाणी टाकल्याचे मला आठवते. मी तसा शांत मुलगा होतो. एकदा गानू सरांनी २९ चा पाढा वर्गासमोर येवून बोलण्याचे आम्हास आव्हान दिले. मी ते स्वीकारले परंतु २९ सक १७४ आणि २९ साता २०३ ह्या मध्ये कोठेतरी मी गडबडलो आणि छडीचा प्रसाद मला मिळाला. ह्या वर्षी ज्ञानेश, वैभव बाबरेकर ह्या सारख्या काही नवीन मुलांचे आमच्या वर्गात आगमन झाले
. ज्ञानेशचे कथ्थक नृत्य ह्या वेळी प्रसिद्ध होते. १९८३ साली भारताने क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि त्यामुळे आमच्या वर्गात क्रिकेटचे वेड नव्याने पसरले. नारळाचा थोपा आणि कोनफळे ह्यांनी आम्ही बरेच क्रीडा तास क्रिकेट खेळण्यात घालविले. आता इथल्या काही आठवणीत सहावी सातवी यांची सरमिसळ होत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. पिंगळे सर मराठी शिकवीत. एकदा त्यांनी मराठी निबंध लिहावयास दिला होता. मी चुकून 'मजा आली' च्या ऐवजी मजा आला असे लिहिले. सरांनी माझा हा उर्दू वापरण्याचा प्रयत्न समजून माझी प्रशंसा केली, त्यात सुधारणा दाखविली आणि शेवटी मराठीच्या निबंधात उर्दू वापरणे शालेय जीवनात तितकेसे बरोबर नाही असे मत नोंदविले. भारताने ह्याच सुमारास INSAT ह्या मालिकेतील उपग्रह अंतराळात सोडण्यास सुरुवात केली होती. पहिला पाऊस ह्या विषयावर निबंध लिहताना आम्ही सर्वांनी त्यावेळी दूरदर्शनवर दाखविल्या जाणाऱ्या INSAT उपग्रहाद्वारे घेतल्या गेलेल्या चित्राचा संदर्भ देण्यास सुरुवात केली. बाबरेकर सर इतिहास शिकवीत. परीक्षा झाल्यावर मुले उत्तरपत्रिका आणल्या का असे प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडत असत. अशा वेळी आताच वाटेत रद्दीवाला भेटला आणि त्याला तुमच्या उत्तरपत्रिका देवून टाकल्या असे त्यांचे आवडते उत्तर असे. वैद्य सरांचे धाकटे भाऊ आम्हाला सातवीस इंग्लिश शिकविण्यासाठी आले. त्यांची 'तर सांगायची गोष्ट अशी की' ही प्रस्तावना आमची आवडती बनली होती. पाचवी ते सातवी शाळा सकाळची असे आणि ह्यातील एक दिवशी सकाळी PT चा तास असे. त्यावेळी उभ्या आणि बैठ्या व्यायामप्रकारांचा सराव होत असे. पठाण सर ह्यात पुढाकार घेत असत. ह्या वेळी वाजविले जाणारे
Tudutu tudutu tudutu tu …. Tudutu tudutu tudutu tu …. हे संगीत न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या अजूनही चांगलेच स्मरणात आहे. त्यावेळी statue आणि जॉली असल्या प्रकाराने मुले आपली करमणूक करून घेत असत. सातवीत पुराणिक सर हिंदी शिकविण्यासाठी आले. सर मध्येच उग्र स्वरूप धारण करीत. असेच एकदा त्यांनी कोणी कोणी पुस्तके आणली नाहीत ह्याची तपासणी करण्यास सुरुवात केली. पुढील बाकांची तपासणी करत करत ते मागे येत असता समीर कंक ह्याने पुढचा दुर्धर प्रसंग ओळखून बाकांच्या खालच्या मार्गाने प्रस्थान केले आणि तो पहिल्या बाकावर प्रकटला. हा प्रसंग आमच्या सर्व वर्गाच्या अजूनही चांगलाच लक्षात आहे. ह्यावेळी शाळेचे स्नेहसंमेलन हा एक चांगला उपक्रम असे आणि मुल-मुली त्यात उत्साहाने भाग घेत.
सातवीची स्कॉलरशिप परीक्षा सेंट ऑगस्टीन शाळेत १० मार्च १९८५ रोजी झाली. ह्याच दिवशी बेन्सन आणि हेजेस स्पर्धेचा, भारत - पाकिस्तान असा अंतिम सामना होता. मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्या तीन पेपरांच्या मधील सुट्टीत मी अवि सावे (१९८५ batch ) ह्यांच्या घरी जावून ह्या सामन्याचा आनंद लुटला. आठवीत गेल्यावर शाळा दुपारची झाली. काही गोष्टी नव्याने आल्या. NCC आणि Scout ह्या विद्यार्थी चळवळींचे आम्ही सभासद बनलो. ह्या मुलांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळे. ह्या कार्यक्रमाचा सराव फार जोरात चाले आणि अजूनही चालतो. NCC ची मुले Scout च्या मुलांपुढे भाव खात. वार्षिक लसीकरणाचा कार्यक्रम साधारणतः पावसाळ्यात हाती घेतला जाई. तो बाका प्रसंग ओढविल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने शाळेत पसरे. मग मुलांमध्ये हे टाळण्यासाठी काही निमित्त शोधता येईल काय याचा प्रयत्न सुरु होई. लसीकरणाच्या दुसर्या दिवशी बरीच मुले तापाने आजारी पडतआणि शाळेतील उपस्थिती कमी होई. न आजारी पडलेली मुले, आपल्या प्रतिकारशक्ती विषयी मोठी फुशारकी मारीत.
जानेवारी महिन्यात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपल्यावर दुसरी घटक चाचणी होत असे. आणि मग फेब्रुवारी महिन्यात ३ दिवसाचा वार्षिक क्रीडामहोत्सव असे. त्यावेळी थंडी अगदी जोरात असे. सकाळी सात वाजता मैदानावर हजर व्हावे लागे. थंडीने दात कडकडा वाजण्याचा अनुभव ह्या क्रीडामहोत्सवात मी घेतला आहे. प्राथमिक शाळेत आधी वर्णन केल्याप्रमाणे लंगडी स्पर्धेत अजिंक्यपद मिळविण्यात आम्हां मुलांना कधीच यश मिळाले नाही. नववीत असताना क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता मी मैदानावर हजर होतो आणि अचानक आमचा कबड्डीचा सामना घोषित झाला. मला काहीशा नाइलाजाने मैदानात उतरावे लागले. राहुल सारखी आमच्या वर्गातील तगडी मुले त्यावेळी मैदानात नव्हती. त्यामुळे आमचा संघ आधीच कमकुवत होता आणि समोर बलवान ड वर्ग होता आणि बहुदा पठाण सर धावते समालोचन देत होते. कोणास ठाऊक कसं पण सुरुवातीलाच मी चुकून एक पकड केली आणि नंतर भाग्याने आम्हांला साथ दिली आणि बघता बघता आम्ही तगड्या ड संघावर लोण चढविला. त्यामुळे आणि सरांच्या रसभरिल्या धावत्या समालोचनामुळे ड वर्ग पुरता चवताळला. त्यानंतर मात्र त्यांनी आम्हांला जराही संधी दिली नाही. एक दोन वेळा माझी जोरदार पकड करून मग पिटाई सुद्धा करण्यात आली.
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर अ संघ खोखोच्या सामन्यात अजिंक्यपद मिळवे. अमित काणे वगैरे लोकांनी असा इतिहास निर्माण केला होता. पण आमच्या संघात मात्र अशी कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. आम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यातच गारद होत असू.
शनिवारची सकाळची शाळा संपल्यानंतर आठवी अ विरुद्ध ब किंवा आठवी अ विरुद्ध नववी अ असे टेनिस चेंडूंचे सामने घेण्याची त्यावेळी परंपरा होती. प्रत्येकी एक रुपया वर्गणी काढून हे सामने खेळले जात. त्यावेळी राकेश राऊत हा आमचा वेगवान (?) गोलंदाज होता. तो बऱ्याच लांबून धावत येवून चेंडू टाकायचा म्हणून वेगवान! तसं म्हटले तर अजूनही त्या परिस्थितीत काही बदल झाला नाही!! पण एकदा राहुल साठे सामना खेळावयास आला आणि त्याने वेगवान गोलंदाजी म्हणजे काय असते ह्याचे प्रात्यक्षिक घडविले. त्याने ३-४ षटकात प्रतिस्पर्धी संघाचे ५ -६ फलंदाज तंबूत परत पाठविले. त्या नंतर तो दमल्यावर पुढील तळाचे फलंदाज बाद करता करता आमच्या नाकी नऊ आले ही गोष्ट वेगळी! मी ह्या सामन्यात कधी कधी भाग घेत असे. तसा मी चांगला फलंदाज असल्याचा माझा विश्वास लहानपणापासून आहे. अशा सामन्यात मला सलामीला पाठविले जाई. प्रत्येक चेंडूवर एक तरी धाव झाली पाहिजे अशा माझ्या अट्टाहासापायी मी लवकरच बाद होई. योगेश पाटीलने त्याला मी चौकार मारल्यावर माझा उडविलेला त्रिफळा माझ्या अजूनही लक्षात आहे.
आठवीत मी पुन्हा गणित प्राविण्य आणि प्रज्ञा परीक्षेस बसलो. ह्यावेळी नारखेडे सर आमचे क्लास घेत. 0 ! = १ ही संकल्पना त्यांनी आम्हाला शिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव आम्हाला ते पटतच नव्हते मग शेवटी त्यांनी त्या दिवसापुरती क्लास सोडून देवून स्वतःची सुटका करून घेतली. ह्या वेळेला प्राविण्य परीक्षा शाळेतच झाल्याने पाकीटमारीच्या संभाव्य धोक्यापासून आम्ही वाचलो!
बाकी मुलांची मस्ती खूप वाढली होती. नववीत तुपकरी मॅडमना आमचा वर्ग भंडावून सोडीत असे. दहावीत एकदा गृहपाठ न केल्यामुळे मोद्गेकर सरांनी सर्व मुलांना बाहेर काढले होते. त्यात एकाही मुलीचा समावेश नव्हता! खरोखर त्या सर्वांनी गृहपाठ केला होता की नाही हे देव जाणे! पण मुलांनी बाहेर काढल्यावर फुटबाल घेवून मागच्या मैदानावर प्रस्थान केले. एकटा ज्ञानेश मात्र पश्चातापदग्ध होऊन वर्गाबाहेर तासभर उभा राहिला. आठवीत आमची सहल महाबळेश्वर आणि पाच किल्ले अशी गेली होती. त्यात मजेचे खूप प्रसंग आले. एकदा नदीवर आंघोळ केल्यावर मुलांनी बसवर कपडे वाळत घातले. काही वेळानंतर स्थळ दर्शनानंतर बस सुरु होताना वरील कपड्यांची आठवण कोणास राहिली नाही आणि तासाभराने आठवण झाल्यावर वार्यावर उडून गेलेल्या कपड्याच्या आठवणीने सर्व हवालदिल झाले! नववीत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा वसई मैदानावर सुरु झाली! उद्घाटनाची ही स्पर्धा आपल्या शाळेने जिंकली. त्यावेळी सुजित देवकर, मिलिंद पाटील अशा दिग्गज (?) खेळाडूंचा उदय झाला! त्यावेळी बरेच विवादास्पद प्रसंग ओढवयाचे! उपांत्य फेरीच्या सामन्यात आपल्या गोलंदाजास पंच सल्ला देत असल्याचा आरोप नॉन - स्ट्रायकर फलंदाजाने केला. त्यानंतर अर्धा पाऊण तास मैदानावर गोंधळ माजला होता.
नववी, दहावी मी फडके सरांकडे क्लास सुरु केला. त्यांच्या आणि मृणाल / संगीता मॅडमच्या मार्गदर्शनाचा मला लाभ झाला. नववी ते दहावीच्या मी महिन्याच्या सुट्टीत त्यांनी माझा दहावीचा बराच अभ्यास करून घेतला होता. पठण शक्ती कशी सुधारायची याचे उत्तम प्रशिक्षण मला इथे मिळाले. आठवी पासून शाळेत शिकविण्यासाठी N C राऊत, मोद्गेकर, भिडे सर, सापळे मॅडम, कुलकर्णी मॅडम, विंद्वास मॅडम ह्यांच्या सारख्या दिग्गज शिक्षकांचा समावेश होता. एकंदरीत ते वातावरण भाराविलेले होते. १९८५ साली वासंती केळकर, शीतल गवाणकर, १९८६ साली संयोगिता, १९८७ साली मोना, नीलिमा महाडिक ह्या सर्वांनी शालेय गुणवत्ता यादीत येवून शाळेचे नाव प्रसिद्ध केले होते. मोद्गेकर सरांची भूगोल शिकविण्याची पद्धत असो की भिडे सरांचे गणित शिकविण्यातील कसब, विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत जाण्याचे कसब ह्या दिग्गज शिक्षकांमध्ये होते. चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून का दिसू शकते हे मोद्गेकर सर स्वतः गोल गोल फिरून समजावून देत असत, दुसर्या महायुद्धाची कारणे स्पष्ट करताना सरांनी मनाने त्या काळात प्रवेश केलेला असायचा! कर्मधारय, बहुव्रीहि समास आणि संधी राऊत सरांकडून शिकण्याची संधी ज्यांना मिळाली त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. बीजगणितातील समीकरणांचा पाया भिडे सरांनी इतक्या भरभक्कमरित्या उभारला की पुढील महाविद्यालयीन जीवनात गणित कधी कठीण वाटले नाही, तीच गोष्ट सापळे मॅडमनी शिकविलेल्या विज्ञान शाखेची! कुलकर्णी मॅडमनी शिकविलेल्या देव, माला आणि वन ह्या शब्दांची संस्कृत रूपे आठविण्याचा अयशस्वी प्रयत्न अजूनही मी कधी कधी करतो!
२० फेब्रुवारीला शाळेचा सेंड ऑफचा कार्यक्रम झाला. १६ मार्च ते २९ मार्च अशी दहावीची परीक्षा आटोपली आणि २० जूनला निकाल लागल्यानंतर सर्वांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाह्य जगात प्रवेश केला! अशा ह्या शालेय जीवनातील माझ्या आठवणी, जितक्या आठवल्या तितक्या इथे नोंदल्या!