Wednesday, May 29, 2013

आभास - भाग १४


स्कॉटलंडला पोहोचताच आलोकने चेनला त्याच्या तळाशी संपर्क साधून तेथील विविध भागातील मनुष्यगणन संख्या घ्यावयास सांगितली. त्याच्या सुदैवाने जवळील एका तलावात त्याला एक मनुष्यगणन मिळाले. दोन मैलावरील ह्या तलावाकडे गाडी घेवुन आलोक स्वतःच वेगाने निघाला. वेगाने सुरु होणार्या गाडीत चेन कसाबसा शिरला. त्याने रागाने टाकलेल्या कटाक्षाकडे आलोकने दुर्लक्षच केले.
एका स्वप्नवत दिसणाऱ्या तलावात नौकाविहार करणाऱ्या डायनाची शांती गाडीच्या आवाजाने भंग झाली. गाडीतून उतरणाऱ्या एका मानवाकृती आणि रोबोसदृश्य आकृतीकडे पाहून ती पुरती गोंधळून गेली. आलोकचे हे रोबोपुराण तिला अजिबात माहित नव्हते आणि तो इतक्या वेगाने आणि अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचू शकेल ह्याची तिने कल्पनासुद्धा केली नव्हती. तिच्या मनात भलताच संशय आला, अजून कोणीतरी पृथ्वीवर अस्तित्वात आहे किंवा ह्या समोर दिसणाऱ्या माणसाने रोबोच्या मदतीने हे सारे घडवून आणले आहे आणि आता तो आपला काटा काढण्यासाठी इथवर पोहोचला आहे असा विचार करून तिने नौकेला विरुद्ध दिशेला वळविण्याचा प्रयत्न केला. अर्थात तिच्या मर्यादित नौकानयन कौशल्याच्या दृष्टीने हे फार मोठे कठीण काम होते. तिचा हा प्रयत्न सुरु असतानाच 'थांब डायना, थांब! मी आलोक आहे', अशी हाक तिच्या कानी पडली. आलोकचा संगणकीय आवाज जरी वेगळा असला तरी त्याच्या ह्या हाकेवरून तो नक्की आलोकच आहे हे ओळखण्याइतपत साधर्म्य नक्कीच त्या हाकेत होते. ती लगेचच थांबली. पुढील तास दीड-तास भर नौका किनाऱ्याला लावण्याचा डायनाचा प्रयत्न सुरूच होता. आलोकच्या सूचनांनी तिला मदत होण्याऐवजी भलतेच काही होत होते. शेवटी आलोकच्या सूचनांकडे सरळ दुर्लक्ष करीत तिने स्वतःच्या बुद्धीनुसार प्रयत्न करीत नाव किनाऱ्याला लावली.
'आलोक!', किनाऱ्यावर पहिले पाऊल टाकलेल्या डायनाने मोठ्या भावपूर्ण स्वरात आलोकला साद दिली. 'डायना!' आलोकनेसुद्धा भारावून तिला प्रतिसाद दिला. बाजूलाच उभ्या असलेल्या चेनच्या अस्तित्वाने क्षणभर गोंधळलेली डायना, नंतर मात्र पुढचा मागचा विचार न करता आलोकच्या आश्वासक मिठीत विसावली. चेनच्या भावनिक विश्वात एका नवीन अनुभवाची भर पडत होती. पुढील १ - २ तासभर ते दोघांचीही अखंड बडबड सुरूच होती. हा भावनाउद्रेक ओसरताच मग त्यांच्या चर्चेची गाडी पुढील मार्गक्रमण कसे करायचे ह्याकडे वळली.
निरंजन हा सारा प्रकार अगदी काळजीपूर्वक निरखून पाहत होता. प्रगतावास्थेतील मनुष्यजातीतील दोघांना मूळ पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या पृथ्वीच्या हुबेहूब बनविलेल्या प्रतिकृतीवर आणून तिथे त्यांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करण्याचे त्याचे हे प्रयत्न इथवर तरी बर्यापैकी सफल झाले होते. ह्या सर्व प्रकारात रोबो मध्ये कुठून घुसला हे त्याला कळत नव्हते. त्याची ही गोंधळलेली प्रतिमा पाहून कच बेहद्द खुश झाला होता.
 

No comments:

Post a Comment