Saturday, May 18, 2013

आभास - भाग ८



आलोकचा प्रवास त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्तच वेगात चालला होता. मनातील विचारांची गाडीही त्याहून जोरात चालली होती. अचानक त्याच्या मनात अंतराळात वास्तव्य करून असलेल्या अंतराळवीरांचा विचार आला. पृथ्वीवरील सर्वजण तर नाहीसे झाले पण अंतराळातील लोकांचे काय? डायनाला रात्री हा प्रश्न विचारायचे त्याने नक्की केले. अचानक संगणकाने थोडीशी कुणकुण केली. आलोकने एक नजर टाकली तर wi - fi सिग्नल नाहीसा झाला होता. 'अरे बापरे आता काय करायचे' आलोक मनातून हादरून गेला. Wi-Fi नाही म्हणजे पुढचा मार्ग आपल्याला संगणक दाखवणार कसा? दिल्लीपर्यंत ठीक आहे, रस्त्यावर दिशा, मार्ग दाखविणाऱ्या खुणा तरी असतील पण पुढे नेपाळ, हिमालयाचे काय?
 
सगळ्या शंका कुशंकानी आलोकच्या मनात गर्दी केली होती. ह्या सगळ्या विचाराच्या नादात गाडीने बरेच अंतर पार केले होते. बाविसाव्या शतकातील ह्या गाड्या, सुरेख रस्ते ह्यामुळे आलोक जवळजवळ ताशी १६० किमी वेगाने चालला होता. आपण एकंदरीत उदयपूरला पोहचू शकू अशी त्याला खात्री वाटू लागली. आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास तो उदयपूरला पोहोचला देखील! एका दिवसात आपण इतकी मजल मारली म्हणून त्याने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.
हळूहळू माणसाच्या अनुपस्थितीच्या खुणा शहरात दिसू लागल्या होत्या. शहरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरू लागले होते. पूर्ण अंधार पडायच्या आधी आलोकने एका बैठ्या घराची राहण्यासाठी निवड केली. घरातील गॅस कनेक्शन सुदैवाने अजूनही चालू परिस्थितीत होते. स्वयंपाकघरात थोड्याशा खटपटीनंतर आलोक डाळ आणि तांदूळ सापडले. हे शोधताना मध्ये त्याच्या हाती एक साखरेचा डबा लागला. त्यात कुतूहलाने आलोकने मुंग्यांचा शोध घेतला, पण त्याची निराशाच झाली. हिरव्या भाज्या एव्हाना खराब होवून गेल्या होत्या त्यामुळे आलोकने डाळ भात शिजवता शिजवता लोणचे शोधून ठेवले. त्याचे नशीब जोरात होते अजूनही बाथरूम मध्ये नळाला पाणी होते. नाही म्हणायला टाकीत भरलेले पाणी वापरायला होते तरी कोण? मेणबत्तीच्या प्रकाशात त्याने स्नान आटोपले आणि मग तो जेवावयास बसला. गरमागरम वरणभात आणि लोणचे खाल्ल्यावर त्याला संगणकाची आणि मग डायनाची आठवण झाली. भराभर जेवण आटपून तो मोठ्या आशेने संगणक चालू करता झाला आणि अहो आश्चर्य! Wi-Fi चालू होते. तो  ऑनलाईन येताच डायनाचा त्याला संदेश आला. एकंदरीत ही सर्व उपग्रहानद्वारे चाललेली संदेशयंत्रणा गेले दोन- तीन तास बंद पडली होती आणि केवळ १० मिनिटांपूर्वी चालू झाली होती. 'आता लक्षात घे, ही यंत्रणा केव्हाही बंद पडू शकते, त्याआधी पूर्ण मार्गाची सविस्तर माहिती मी डाऊनलोड करून तुला पाठवून देते. म्हणजे तुला इंटरनेटवर अवलंबून राहायला नको' डायनाच्या स्वरात चिंता दाटून आली होती. तू आता वेळ न घालविता झोप आणि सकाळी लवकर निघ कसा' पडत्या फळाची आज्ञा मानून आलोकने संगणकावरील आपली बैठक उठविली. संगणक चार्जिंगला लावला. 'रात्र एकट्याने घालविणे कठीण आणि त्यात अनोळखी ठिकाणी तर अधिकच कठीण!' आलोक विचार करीत होता. म्हणायला गेले तर wi - fi मध्येच बंद पडल्यामुळे तो जबरदस्त हादरला होता. सपाट प्रदेशात मार्ग हरविणे एकवेळ चालेल पण उंच भागातून जाताना एकदा का दिशाभूल झाली की संपलेच एकदाचे! विचार करता करता तो घराचे मुख्य दार बंद करायला आला आणि त्याला उगीचच हसू आले. येणार तरी कोण आहे घरात? चोर दरवडेखोर तर नाहीतच आणि भुते असलीच तर ती थोडी बंद दारांना भीक घालणार. दार तसे व्यवस्थित बंद होते, एक कडी लावायची बाकी होती. आलोकने ती लावली आणि अचानक त्याचे लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाकडे गेले. आकाशातील सर्व तारे , ग्रह एकदम स्पष्ट दिसत होते. त्यांचा प्रकाश अडविणारे सर्व मानवनिर्मित अडथळे दूर झाले होते ना! अचानक एक छोटा ठिपका आकाशात पुढे पुढे सरकताना त्याला दिसला. उपग्रहच होता तो! आलोकच्या आशेला पुन्हा एकदा पालवी फुटली. तो ठिपका पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत आलोक त्याच्याकडे टक लावून पाहत होता. आलोकच्या मनात चाललेल्या विचारांच्या वादळावर थकलेल्या शरीराने विजय मिळविला. पुढील पाच दहा मिनिटात तो निद्राधीन झाला.
इथे डायना मात्र फ्रीजमधील शेवटच्या पिझ्झाच्या तुकड्यावर आपली भूक भागवता भागवता संपूर्ण मार्गाची माहिती डाऊनलोड करीत होती. पुढील पाच तासात तिची ही सर्व माहिती उतरवून झाली. तिने ती आलोकला पाठविली सुद्धा आणि तिने तशीच बिछान्यावर ताणून दिली. तत्कालीन व्यवस्थेनुसार ही सर्व माहिती आलोकच्या संगणकात उतरविली गेली सुद्धा!
सकाळी पाचच्या सुमारास आलोकला जाग आली. झटापट त्याने निघायची तयारी केली, त्या घरात सापडलेले त्याच्या मापाचे नवीन कपडे सुद्धा त्याने घेतले. डायनाला फोन करण्याचा मोह त्याने घड्याळाकडे नजर टाकत आवरला. गाडी चालू करता करता त्याची नजर पेट्रोलच्या खुणेकडे गेली. पेट्रोल आता फक्त पाव भाग शिल्लक राहिले होते. पेट्रोल आता शहरातून बाहेर निघायच्या आत भरले पाहिजे असे स्वतःला त्याने बजावले. महामार्गाला लागण्याआधी थोडासा शहरी रस्ता होता. तिथून जाता जाता एका अलिशान बंगल्यातील एका तितक्याच अलिशान गाडीकडे त्याचे लक्ष गेले. त्याला मोह काही आवरला नाही. काही मिनिटातच आपल्या नवीन कौशल्याच्या आधारे त्या अलिशान गाडीत आलोक सवार होता. नाही म्हणायला ह्या गाडीचा पेट्रोल टॅंक फुल होता
महामार्गावर पोहोचल्यावर आलोकच्या समोर दोन दिशादर्शक खुणा होत्या. उजवीकडे मुंबई आणि डावीकडे दिल्ली! गाण्याचा अर्थ न समजता गाणी गुणगुणायची आलोकची सवय तशी जुनी होती. 'एक तरफ उसका घर, एक तरफ मैकदा' असे २ -३ मिनटे गुणगुणत तो एका जागी थांबून राहिला होता. शेवटी कोणत्या विचाराने का माहित नाही पण त्याने दिल्लीचा रस्ता पकडला!
 

2 comments:

  1. Nice story sir, pn plz thode mothe part tkat ja...

    ReplyDelete
  2. Thanks..Sure will try for longer parts but can't promise. Here are some other comments from a friend on mail
    लॅपटाॅप चार्ज कसा केला विजेशिवाय? :) - Aditya - This is clearly mistake in story


    Why is your hero not using tablet with solar power and satellite navigation? ;) or Google glass :) - Aditya- Aalok needs to keep himself up to date with technology

    ReplyDelete