Saturday, May 11, 2013

आभास भाग ५


(तज्ञ वाचकहो - मागील भागात डायनाने जितक्या सहजतेने फेसबुक आणि गुगल संकेतस्थळांचा डेटा मिळविला हे तर्कसंगत बुद्धीला पटण्यासारखे नाही हे मान्य! पण कथा म्हटली म्हणजे थोडी अतिशोयक्ती आलीच )
 डायनाने त्या संगणकाच्या I.P. पत्त्यावरून तो भारतातील संगणक असल्याचे जाणले होते  ज्या विशिष्ट वेळी हा संगणक कार्यरत होतो ती वेळ लक्षात ठेवून त्या  वेळी ती संगणकावर बसून उत्कठेने वाट पाहू लागली. आज आलोक थोडा जास्तच उदास होता त्यामुळे संगणकावर यायला त्याला थोडा जास्तच उशीर झाला. डायना वाट पाहून पाहून कंटाळली होती आणि अचानक तिला त्या पत्त्यावर हालचाल दिसू लागली. तिने मोठ्या आतुरतेने त्या पत्त्यावर तत्काळ निरोप पाठवला 'hi there!' आलोकच्या अंगातून आनंदाची एक तीव्र लहर उमटून गेली. 'hello' आलोकने तत्काळ प्रतिसाद दिला. 'तुझे नाव काय?' डायना विचारती झाली. 'आलोक' ह्या उत्तरावर हे पुरुषाचे नाव आहे हे ओळखण्याइतपत डायनाचे सामान्यज्ञान चांगले होते.
डायना - 'तुम्ही किती जण आहात तिथे?'
आलोक - मी एकटाच आहे. तुझे नाव काय?
डायना - डायना
बापरे १९९७ साली अपघाती मरण पावलेल्या प्रिन्सेस डायनाचे हे भूत तर नव्हे ना असा भीतीदायक विचार आलोकच्या मनात येवून गेला.  तरीही त्याने त्या विचाराला मागे सारले.
आलोक -  'तुम्ही किती जण आहात तिथे?'
डायना - मी एकटीच
त्यानंतर त्या दोघांची चर्चा खूप वेळ रंगली. हे काय झाले आहे ह्याचा त्या दोघांनाही अजिबात थांगपत्ता नव्हता. एकटे राहून आलोक खूप कंटाळला होता. परंतु भेटायचे तर कुठे आणि कसे? तुला विमान तर चालवता / उडवता येत असेलच? डायनाने थोड्या मिश्किल स्वरात विचारले. 'एक वेळ उडविता येईल, पण खाली कसे आणणार हे माहित नाही' डिस्कवरीवरील एका कार्यक्रमात पाहिलेली विमान उड्डाणाचे चित्रण आठवून आलोक उद्गारला.
त्या नंतर त्या दोघांची बराचवेळ शास्त्रीय चर्चा झाली. आलोक लगेच गुगल वर धुंडाळता झाला. त्याला २ वर्षापूर्वी पाहिलेल्या http://www.londondelhibyroad.com/ ह्या संकेतस्थळाची आठवण झाली. मग डायनाने त्याला तुझी गाडी कोणती हे विचारले. मारुती स्विफ्ट ही गाडी जवळपास ९००० मैल अंतर पार पाडू शकेल ह्याची डायनाला  शाश्वती वाटली नाही, परंतु आलोक मात्र ह्या गाडीविषयी छातीठोकपणे ग्वाही देत होता. गाडी बिघडली तर तू काय करणार? ह्या प्रश्नाला वाटेत लागणाऱ्या गावातील गाड्या आपल्याच आहेत ह्यावर त्यांचे एकमत झाले! चावी न मिळाल्यास त्या गाड्या कशा चालू करायच्या, ह्याचे जुजबी ज्ञान करून घेण्याचा सल्ला डायनाने त्याला दिला. आलोकचा संगणक ह्या लांबवरच्या प्रवासात साथ देईल आणि वाटेतील Wi-Fi जाळी त्याला सतत डायनाच्या संपर्कात ठेवतील असे गृहीतक करण्यावर दोघांचेही एकमत झाले.
दुसऱ्या दिवशीच सकाळी निघण्याचा आलोकने निर्णय घेतला. डायनाचा दूरध्वनी क्रमांक, पत्ता तिने ई-मेल वर पाठविले ते आलोकने संगणकात साठविले. तुही प्रवास चालू केलास तर आपण अर्ध्या वेळात भेटू शकू असे आलोकने तिला सुचविले सुद्धा!
मला माझे ब्रायटन / होव सोडून युक्रेन, कझाकस्थान सारख्या ठिकाणापर्यंत प्रवास करायचा नाहीये. डायनाने ठासून सांगितले. बायकांच्या निग्रही (एक चांगल्या शब्दाचा काहीसा चुकीचा वापर :) स्वभावाचे अखिल भूमातेवर सारख्याप्रमाणात वाटप करणाऱ्या त्या भगवंताचे स्मरण करून आलोक आपल्या ह्या दीर्घ प्रवासाच्या तयारीला लागला. 

No comments:

Post a Comment