Saturday, May 25, 2013

आभास - भाग १३

आलोकने चेनला त्याच्या तळाशी संपर्क साधावयास सांगितला. काहीशा प्रयत्नानंतर तो संपर्क साधण्यात यशस्वी झाला. तळाकडून मिळालेल्या माहितीनुसार डायना अजूनही स्कॉटलंडमध्येच होती. आत्मविश्वास दुणावलेल्या आलोकने चेनला पुन्हा विमानाकडे प्रस्थान करण्याचा आदेश दिला. 'नाही' चेन उत्तरला. आपल्या ऐकण्यात काहीतरी गडबड झाली असे वाटून आलोकने पुन्हा तोच आदेश दिला. पुन्हा चेन 'नाही' म्हणाला.
चिनी लोकांनी रोबोंना जरी बुद्धिमत्ता आणि भावनांक दिली असली तरी त्यांनी रोबोंचा मनुष्याशी संपर्क अगदी मर्यादित ठेवला होता. त्यामुळे रोबोंच्या भावना जास्त विकसित होत नव्हत्या. परंतु आधीच बुद्धिमान असलेला चेन गेले काही दिवस आलोकच्या सहवासात चोवीस तास होता आणि आलोक ज्या ज्या भावनाकल्लोळातून जात होता ते चेन जवळून पाहत होता. आता आपल्याला ज्या क्षमतेवर काम करण्यासाठी निर्माण केले गेले आहे त्याहून बरेच अधिक काम आलोकने आपल्याकडून करून घेतले आहे ही माहिती चेनने ग्रहण केली होती. आणि नव्याने विकसित झालेल्या त्याच्या भावनिक शक्तीने त्यापलीकडे काम करण्यास नकार दिला होता.
आलोक मात्र पूर्ण गोंधळून गेला. तंत्रज्ञानाशिवाय ह्या बिंदुपासून डायनाचा शोध घेण्याची त्याची तयारी होती. चेनने केलेले उपकार तो विसरू शकत नव्हता परंतु ह्या क्षणी चेन असा का वागत आहे हे आलोकला कळेनासे झाले होते आणि जर समजा ह्याच डोक फिरलं वगैरे असेल तर, डोकं फिरलेले रोबो काय उद्रेक माजवू शकतात ह्याची आलोकला चित्रपटाद्वारे थोडीफार जाणीव होती.
आलोकने राहिलेला थोडाफार धीर एकवटून चेनला निद्रितावस्थेत ढकलण्याचा प्रयत्न केला. आलोकची भीती खरी ठरली. चेनने निद्रितावस्थेत जाण्यास नकार दिला. रात्र चढत चालली होती पण आलोकची झोप पूर्ण उडाली होती. आलोकने विमानतळावरील प्रतीक्षाकक्षात बैठक ठोकली. चेनसुद्धा समोरच्या खुर्चीवर येवून बसला. २ मनुष्यजीव, अनेक रोबो आणि एक विकसित रोबो असलेल्या पृथ्वीवरील वातावरणात एक अजब सन्नाटा पसरला होता.
थकल्याभागल्या आलोकचा पहाटेच्या सुमारास कधीतरी डोळा लागला. सकाळी अचानक त्याची झोप उतरली तेव्हा तो एकदम दचकला. चेन अजूनही तसाच समोर बसून होता. आलोकला काहीसं हायसे वाटले. 'चला, विमानात बसुयात' चेन स्वतःहून उद्गारला. आता आलोकची हिम्मत झाली नाही. 'मोटारीतून जावूयात' आलोक म्हणाला. चेनने हे म्हणणे ऐकले.
सुसाट वेगाने गाडी चालविणाऱ्या चेनकडे आलोक टक लावून पाहत होता. 'बघताय काय माझ्याकडे, काल मी दमलो होतो' हे ऐकताच आलोक जागच्या जागी उडायाचाच बाकी राहिला. भावनाशुन्य माणसे आणि  भावनापूर्ण रोबो ह्यापैकी अधिक खतरनाक कोण असा विचार करता गाडीने स्कॉटलंडचे अंतर कसे गाठले हे काही त्याला कळले नाही!
 

No comments:

Post a Comment