Monday, May 13, 2013

आभास - भाग ६




रात्रभर आलोक तळमळत जागा होता. आतापर्यंतची त्याची सर्वात लांबवर फेरी केरळपर्यंत होती आणि तीही एक पर्यटन संस्थेबरोबर! आतापर्यंतचा सर्वात लांबचा ड्राईव्ह होता तो कोकणापर्यंत. अशा पार्श्वभूमीवर गाडीने लंडन म्हणजे जरा जास्तच होते. आणि बाकी आजूबाजूच्या सर्वांचे काय झाले हा सतत डोक्याला भुंगा लावणारा प्रश्न होताच. बाकी डायनावर भरंवसा टाकतोय ते ही कितपत योग्य असा प्रश्न त्याचे अंतर्मन राहून राहून त्याला करीत होते. तिने आपल्याला बरोबर शोधून काढलाच कसा? ती म्हणते खरी की ती एकटी आहे पण त्यावरही कसा भरवसा करायचा? आणि तिथे तिची टोळी असली मग? बाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही मराठी मध्यमवर्गीय मानसिकता कायम राहिली आहे हे पाहून अखिल वाचकवर्ग खुश झाला असावा!
मग त्याच्या विचाराची गाडी स्विफ्टकडे वळली. इतक्या लांबच्या प्रवासात तिला काय झाले तर ती मध्येच रस्त्यात सोडून द्यावी लागणार ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही. बाकी सामान काय भरायचे हा सर्वात गहन प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. सामानाची यादी जसजशी लांबत चालली तसा त्याचा स्विफ्टला घरीच ठेवायचा निर्णय पक्का झाला. मग त्याने समोरच्या इमारतीतील इनोवा घ्यायचा विचार पक्का केला. त्या निमित्ताने गाडी चावीशिवाय कशी व्यवस्थित सुरु करायची हा ही विचार होताच.
सकाळ होताच आलोक सामान भरावयास लागला. सामानाची यादी करताना त्याने कपडे, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या अशा सर्व गोष्टी भरण्यास सुरुवात केली. बाजूच्या दुकानात त्याच्या ह्या निमित्ताने दोन तीन फेऱ्याही झाल्या. मग त्याची ट्यूब पेटली. हे सामान आताच भरायची काय गरज आहे? वाटेत आपल्याला हे मिळेलच की! पण त्यानंतर त्याच्या मनात तिबेट, चीनच्या दुर्गम भागातील प्रवासाचा विचार मनात डोकावला. त्यामुळे हे सर्व सामान दिल्लीच्या आसपास भरायचे हे त्याने नक्की केले. अरे पण मधल्या भागात कोणी माणसे जिवंत असली तर? ती सुसंस्कृत असली म्हणजे कमावले. मग डायनाचे काय? ती बिचारी वाट बघत बसेल ना आपली, आलोक विचार करता झाला. अचानक त्याच्या मनात अजून एक विचार आला आणि त्याने सरळ संगणकाद्वारे डायनाचा नंबर फिरविला. सकाळ सकाळी चार वाजता फोनची बेल वाजल्याने डायना कमालीची संतापली. असून असणार कोण? आलोकच ना असा विचार करीत तिने महत्प्रयासाने फोन उचलला. 'अग, अजून इतर कोणत्या ip पत्त्यावरून तुला काही हालचाल दिसली का? आलोक विचारत होता. 'हो बिपाशा बासू वांद्र्याहून कनेक्ट झालेली रात्री!' असे रागाने म्हणत डायनाने फोन दाणकन आपटला. आलोकने घड्याळाकडे पाहिले आणि त्याला आपली चूक लक्षात आली. काही का असेना त्याला त्याचे उत्तर मिळाले होते. बाकी एकविसाव्या शतकातील प्रसिद्ध (?) नट्यांची नावे वापरायची पद्धत अजूनही प्रचलित होती. बाकी हिमालयात येती असला तर? ह्या विचाराने आलोक थोडा विचलित झाला.
शेवटी इतक्या सगळ्या विचाराच्या वादळातून बाहेर पडून आलोक ११ वाजताच्या सुमारास इनोवातून एका ऐतिहासिक प्रवासासाठी निघाला! !

2 comments: